कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शेडशाळ (ता. शिरोळ) येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून केल्याप्रकरणी तसेच आईला सोडविण्यासाठी आलेल्या मुलीलाही मारहाणीचा प्रयत्न केल्याप्रकरणी तम्मणा कृष्णा जयण्णावर याला जयसिंगपूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावली आहे.

तसेच मुलीला मारहाणीचा प्रयत्न केल्याप्रकरणी ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड अशी एकूण १० वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती जी. बी. गुरव यांनी ही शिक्षा सुनावली. मार्च २०१६ साली ही खूनाची घटना घडली होती. या घटनेची फिर्याद सुरेश हणमंत आवळे यांनी कुरुंदवाड पोलिसांत दिली होती.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आरोपी जयाण्णावर याने ८ मार्च २०१६ रोजी महिला दिनीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून केला होता. यावेळी आईला सोडविण्यासाठी मुलगी अंजली आली असता तिलाही मारहाणीचा प्रयत्न केला होता. खूनाची घटना समजताच कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांनी आरोपीवर खूनाचा गुन्हा नोंद करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

यामध्ये १९ साक्षीदारांचे साक्ष आणि सरकारी वकील अँड व्ही. जी. सरदेसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.