कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरवासीयांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक असून गेल्या तीन दिवसात पोलिस आणि महापालिकेच्या पथकांनी २ लाख ६ हजार ५०० रुपयांचा दंड केला असल्याची माहिती आयुक्त् डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी दिली. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन व्यापक उपाययोजना प्रभावीपणे राबवित आहे.
आयुक्त डॉ. कलशेटटी म्हणाले की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त असून यामध्ये नागरीकांनी कसलीही तडजोड करु नये. घराबाहेर पडताना मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा, वारंवार साबनाने हात धुवा, कोठेही थुंकू नका तसेच कोरोनाची लक्षणे जाणवताच तात्काळ तपासणी करुन घ्या असेही ते म्हणाले.
कोल्हापूर शहरात विना मास्क फिरणे, सामाजिक अंतर न ठेवणे, हॅण्डग्लोज न घालणा-या दुकानदार, व्यवसायिकांवर कठोर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्यावतीने पथके तैनात केली असून गेल्या तीन दिवसात या पथकामार्फत २ लाख ६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये १५ सप्टेंबर रोजी ६८ हजार ७००, १६ सप्टेंबर रोजी ६६ हजार ८००, १७ सप्टेंबर रोजी ७१ हजार रुपयांचा दंडाचा समावेश आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना राबवित असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले.