पुणे  (प्रतिनिधी) : वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी महावितरणकडून वीजचोरीविरुद्ध मोहीम सुरु केली आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत १४१८ ठिकाणी १ कोटी २८ लाख रुपयांच्या अनधिकृत वीजवापराचा महावितरणकडून नुकताच पर्दाफाश करण्यात आला आहे. या एक दिवसीय विशेष मोहिमेत आतापर्यंत ४९८३ ठिकाणी ५ कोटी ६४ लाख ३२ हजार रुपयांच्या वीजचोऱ्या व अनधिकृत वापर उघडकीस आला आहे. वीजचोरी व दंडाची रक्कम न भरणाऱ्या चोरट्यांविरुद्ध विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांच्या सुचनेनुसार तिसऱ्या एक दिवसीय मोहिमेत ९ ऑक्टोबरला सुरु केलेल्या कारवाईत पाचही जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी १६ हजार ५२७ वीजजोडण्यांच्या तपासणीमध्ये १४१८ ठिकाणी ८ लाख ३२ हजार युनिट म्हणजे १ कोटी २८ लाख ८ हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वीजवापर उघडकीस आला आहे. तर  कोल्हापूर मधील ७९ ठिकाणी १३ लाख ४५ हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर उघडकीस आला आहे.

महावितरणने मोबाईल अॅप किंवा अधिकृत संकेतस्थळावरून नवीन वीजजोडणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध केली आहे. यासोबतच वीजबिलांच्या थकबाकीपोटी ज्या ग्राहकांचा वीजपुवरठा खंडित केला आहे. त्यांच्याही वीजजोडण्यांची तपासणी विविध पथकांद्वारे करण्यात येत आहे. परस्पर वीजपुरवठा सुरु करून घेणे किंवा शेजाऱ्यांकडून वीज घेण्याचा प्रकार आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध देखील कारवाई करण्यात येत आहे.