सोलापूर (प्रतिनिधी) : राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे नुसते बोलत बसू नये. तुम्हाला जे राजकारण करायचेय ते करत बसा, अशा शब्दांत खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकासआघाडी सरकारला फटकारले. तसेच आता सकल मराठा समाजाचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले. ते आज (शुक्रवार) सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चात बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांवर टीकास्त्र सोडले.

खा. संभाजीराजे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारला मराठा आरक्षणाची कोणतीही पर्वा नाही. आरक्षण सोडा पण २०१४ पासून आजपर्यंत सरकारने मराठा समाजाचे इतर प्रश्न तरी सोडावलेत का? राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या ३२ टक्के आहे. त्यांना मदत का केली गेली नाही ? मराठा समाजातील तरुणांना घडवणाऱ्या सारथी संस्थेची स्वायत्तता मोडीत काढण्यात आली.

नुसता जीआर काढून किंवा महामंडळांसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करून काही होत नाही. मला कोणत्याही पक्षाशी देणेघेणे नाही, मी राष्ट्रपतीनियुक्त खासदार आहे. मराठा समाजाने सर्व गोष्टींचा अभ्यास करायला शिकले पाहिजे. मागच्या आणि आताच्या सरकारने मराठा समाजाला जाहीर केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात दिल्या का ? नुसते आकडे नको, सरकारने प्रत्यक्षात मदत दिली पाहिजे असल्याचे खा. संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.