मुंबई/प्रतिनिधी : अमरावतीतून नवनीत राणा निवडणूक लढवणार भाजपाच्या तिकिटावर आहेत. त्या युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार आहेत. पण भाजपने आपली सातवी यादी जाहीर केली. यामध्ये नवनीत राणा यांना अमरावतीमधून भाजपाची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करण्याआधी त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.

भाजपाने सातव्या यादीत अमरावतीतून खासदार नवनीत राणा यांना तिकिट दिलं आहे. नवनीत राणा बनावट जात प्रमाणपत्र सादर करून अमरावतीची लोकसभा निवडणूक लढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द करावं असा निर्णय दिला. परंतु, या निर्णयाला राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिलं. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्‍हान देणाऱ्या राणा यांच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या जातप्रमाणपत्राच्या प्रकरणामुळे राणा यांच्या उमेदवारीसमोर अडचणी येत होत्या. त्याचबरोबर नवनीत राणा कोणत्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार याबाबत संभ्रमाचं वातावरण होतं. मात्र भाजपाने उमेदवारी दिली आहे. यानंतर आज नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.

“एका छोट्या संघटनेला जिल्ह्यात पक्षाचं मोठं रुप देणं महत्त्वाचं होतं. याच पक्षाने आमदार आणि खासदारही दिला. आता मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. मला या पक्षाचा राजीनामा देताना धाकधूक आहे. स्वतःच्या पक्षात काम करणं आणि त्यानंतर नवी इनिंग सुरु करणं हे आव्हानात्मक आहे. आता डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत. आज माझे डोळे पाणावले आहेत, जे होणं साहजिक आहे.” असं नवनीत राणांनी म्हटलं आहे.