कोल्हापूर  (प्रतिनिधी) : ओढ्यामध्ये कपडे धुण्यास गेलेल्या सासू- सुनेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना  गडमुडशिंगी (ता.करवीर) येथे आज (मंगळवार) घडली. मीना विष्णू येडेकर (वय ५५)  व अनुराधा महेश येडेकर ( वय २७)  असे मृत्यू झालेल्या  सासू- सुनेचे नांव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून महावितरणविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

विजेची तार पाण्यात पडल्याने दोघींना विजेचा जोरदार झटका बसला.  महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या दोघींना आपला जीव गमवावा लागला आहे. ओढ्यावरून जाणारी उच्च दाबाची विद्युत तार लोंबकळत असल्याचे माहिती ग्रामस्थांनी  महावितरण’ च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मृतदेह सीपीआरमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले. अनुराधा येडेकर यांच्या पश्चात  सासरे, पती व दोन लहान मुले असा परिवार आहे.