चंदगड (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षणामध्ये स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजामध्ये अस्वस्थतता पसरली आहे. त्यातच राज्य सरकारने ‘मेगा पोलीस भरती’ जाहीर केल्यामुळे या असंतोषात जास्तच भर पडली आहे. यामुळे अनेक ठिकाणांहून आंदोलन मोर्चे काढले जात आहेत. असाच सर्वपक्षीय मोर्चा काल चंदगड येथे ढोल ताशा आणि हलगीच्या गजरात काढण्यात आला.
यामध्ये ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ यासह अनेक घोषणा देत रवळनाथ मंदिरापासून सुरू झालेला हा मोर्चा मुख्य बाजारपेठ, पंचायत समितीमार्गे चंदगड तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला. तेथे मराठा समाजाबद्दलचे मनोगत प्रा. दीपक पाटील, संतोष मळवीकर, संदीप नांदवडेकर, नितीन फाटक, बाळू बेनके यांनी मांडले.
यावेळी तहसीलदार विनोद रणवरे यांना निवेदन देण्यात आले. शैक्षणिक प्रवेशाबाबत आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत शासनाने मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरावे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशा मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. प्रा. एन. एस. पाटील यांनी आभार मांडले. यावेळी शांताराम पाटील, अनिल तळगुळकर, पिणु पाटील, भरत गावडे, संदेश आवडन, रमाकांत गावडे, ज्ञानेश्वर धुरी यांसह अनेक सर्वपक्षीय सदस्य सहभागी झाले होते.