सोलापूर/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अकलूज मध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणले, लोकशाही असणाऱ्या देशात सत्ताधारी पक्षाप्रमाणेच विरोधकही तितकेच महत्त्वाचे असतात. मात्र एकाही विरोधकाला मत देऊ नका, असं सांगणं म्हणजे रशियाचे पुतीन आणि भारताचे नरेंद्र यात काहीही फरक नाही, असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला.

दरम्यान, शरद पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांनी अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. या भेटीत माढा लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना भाजपाच्या ४०० पारच्या नाऱ्यावरुन खोचक टोला लगावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. “रशियाचे व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फरक नाही”, असे शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, या निवडणुकीमध्ये पक्षाने जो उमेदवार दिला आहे. तो उमेदवार विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहेत. माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा होती. याबाबत आज त्यांना विनंती केली. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील. सोलापूर जिल्हा नेहमीच पुरोगामी राहिलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आहे”, असे शरद पवार म्हणाले.

“आश्वासने देणे हे भाजपाचे वैशिष्ट्य आहे. ईडी, सीबीआयचा गैरवापर करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूत्र आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे व्लादिमीर पुतिन यांच्यात काही फरक नाही, या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत”, असे शरद पवार म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. पंतप्रधान मोदी यांची अनेक भाषणे पंतप्रधानपदाला शोभण्यासारखी नाहीत. त्यांनी गेल्या निवडणुकीवेळी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील अनेक आश्वासने आजही पूर्ण केलेली नाहीत. पंडित जवाहरलाल नेहरू यांना जाऊन किती वर्ष झाले, त्यांचे योगदान ऐतिहासिक आहे. पण पंतप्रधान मोदी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतात”, असे शरद पवार म्हणाले.