नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या खानपानाचा खर्च स्वत:च्या खिशातून करतात. सरकारी बजेटमधून त्यांच्या खानपानावर एक रुपयाही खर्च केला जात नाही, अशी माहिती आरटीआयमधून देण्यात आली आहे.

राजकीय नेत्यांच्या पगाराची, स्टाईलची जितकी चर्चा होते तितकी त्याच्या खानपानाचीही चर्चा रंगते. यामुळे अनेकदा लोकप्रतिनिधींवर सरकारच्या तिजोरीतून होणाऱ्या एकूण खर्चाबाबत आणि खास सुविधांबाबत प्रश्न  उपस्थित केले जातात. यात पंतप्रधान मोदी यांच्या स्टाईलपासून ते बोलण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची विशेष चर्चा रंगते. पंतप्रधान कार्यालयाने आरटीआयच्या माध्यामातून विचारलेल्या प्रश्नावर ही माहिती दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे सचिव विनोद बिहारी सिंह यांनी आरटीआयला उत्तर दिले की, सरकारी बजेटमधून पंतप्रधान मोदींच्या जेवणावर एकही रुपया खर्च होत नाही.

पंतप्रधानांच्या निवासस्थानाची जबाबदारी केंद्रीय बांधकाम विभागाकडे असल्याचे सांगण्यात आले आहे, तर त्यांच्या वाहनांची जबाबदारी एसपीजीकडे असल्याचे नमूद केले आहे. आरटीआयमधून पंतप्रधानांच्या पगाराशी संबंधित माहितीही मागवण्यात आली होती; मात्र पीएमओने या प्रश्नाच्या उत्तरात केवळ नियमांचा संदर्भ देऊन नियमानुसार वेतनवाढ करत असल्याची माहिती दिली आहे.

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दणदणीत विजय मिळवत संसदेत एन्ट्री घेतली. यानंतर ते देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. यावेळी २ मार्च २०१५ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मोदींनी संसद भवनाच्या पहिल्या मजल्यावरील कॅन्टीनमध्ये जाऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विशेष म्हणजे मोदींना खाण्यात महागडे मशरूम आवडत असल्याचे वृत्त समोर आले होते. यावरून सरकारी तिजोरीतील पैशांची ते उधळपट्टी करत असल्याच्या टीकाही त्यांच्यावर सोशल मीडियामधून झाली होती.