कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभेसाठी कोणाला संधी मिळणार यावरुन महाविकास आघाडी अन् महायुतीत देखील अद्याप चाचपणीच सुरु आहे. यातच आज इचलकरंजी येथील इंडिया आघाडी शिष्टमंडळाने आमदार सतेज पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कोल्हापूर येथे भेट घेत चर्चा केली.

मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने हातकणंगले लोकसभेसाठी उपरा उमेदवार न देता इंडिया आघाडीतील घटक पक्षाचाच उमेदवार द्यावा अशी आग्रही मागणी केली. यावर जयंत पाटील यांनी हातकणंगलेची जागा शिवसेनेकडे आहे. याबाबतचा निर्णय उध्दव ठाकरे हे घेणार आहेत. तरीही इचलकरंजीच्या कार्यकत्यांच्या भावना महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सांगून दोन दिवसात हातकणंगलेच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे महाविकास आघाडी कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करणार यावरुन चर्चेला उधान आलं असून, आज इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीचा वरिष्ट पातळीवर विचार होणार का ? असा सवाल असून, या बैठकीला उपस्थित असलेल्यांपैकी शिष्टमंडळातील काही सदस्यांनी ही माहीती दिली आहे.