कोल्हापूर जिल्ह्यात ईडीच्या छापेमारीने राजकीय वातावरण चांगलच तापलं असून, आमदार हसन मुश्रीफ यांची दुसऱ्यांदा चौकशी केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार मुश्रीफ यांनी कारवाईबाबत आपल्याला कोणतेही समन्स बजावण्यात आले नाही. तरीही चौकशी करण्यात येत आहे. तसेच ठराविक धर्माला टार्गेट करत भाजप हे घडवून आणत असल्याचा आरोप केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ईडीने छापेमारी करताना अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना प्रकरणात मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी केली आहे. आमदार मुश्रीफ यांनी चौकशीबाबत कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं असलं तरी, या कारखान्यातील १०० कोटी घोटाळ्याचा आरोप आमदार मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आमदार मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले, २०२० साली कोणत्याही पद्धतीने पारदर्शक व्यवहार न होता आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही या कंपनीला कंत्राट का दिले? हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत. यातूनच हा व्यवहार केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

”मुश्रीफांनी १५०० कोटीचे कंत्राट जावयाला दिले”

आज ईडीने छापेमारीची कारवाई केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यांनी प्रसारमाध्यमांशी पुन्हा संवाद साधत म्हटले की, हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना १५०० कोटी रुपयांचे कंत्राट त्यांच्या जावयाच्या बनावट कंपनीला दिले. मी याचे पुरावे दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुश्रीफांना हे कंत्राट रद्द करण्यास सांगितले. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १५८ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला. असा देखील आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.