कोल्हापूर (प्रतिनिधी) : उथळपणाने अपरिपक्व व प्रसिद्धीसाठी बालिश कृत्ये करणाऱ्यांना विनाकारण महत्त्व देऊ नका. परमेश्वराच्या कृपेने आपण यशोशिखरावर आहोत. जनतेची सेवा करूया, असा संदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. राधानगरी धरणावर शाहू जयंती साजरी केल्याबद्दल त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) समरजितसिंह घाटगे यांचा नामोल्लेख न करता टोला लगावत आपल्या कार्यकर्त्यांना संदेशही दिला तर काही अतिउत्साही समर्थकांना खडे बोलही सुनावले आहेत.

ना. मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे की, मुरगूड शहरवासियांना पाण्यासाठी दाही दिशा भटकंती लावणाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिवशी राधानगरी धरणावर जाऊन तेथील पवित्र भूमी कलंकित करू नये, असे पत्रक मुरगूडच्या कार्यकर्त्यांनी काढले होते. जिल्हा कोरोना परिस्थितीमध्ये चौथ्या लेव्हलवर असल्यामुळे सर्वच कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे परवानगी मागितली तरी शासकीय अधिकारी परवानगी देणारच नाहीत. अशी परवानगी दिली तर त्यांच्या नोकऱ्या जातील, हे माहीत असल्यामुळे मुद्दाम परवानगी मागायची. परवानगी मिळणार नाही, हे माहीतत असल्यामुळे स्टंटबाजी करायची. त्यानंतर ही परवानगी कोणाच्यातरी सांगण्यावरून दिली नाही, अशीच सहानुभूती मिळवायची. त्यातून प्रसिद्धी मिळवायची, अशा बालिश बुद्धीच्या सल्लागारांचा सल्ला ऐकून अशी कृती करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. परमेश्वराने आपल्याला फार मोठी संधी दिलेली आहे. या काळामध्ये आपण जनतेची सेवा करू. जनतेने नाकारलेल्यांना दुसरे कोणतेही काम राहिलेले नाही. त्यामुळेच, उथळपणाने बालिश व अपरिपक्व कृती केल्या जात आहेत.

आंबेओहळ प्रकल्पाच्या पाण्याचे पूजन झाले नाही; फक्त वंदनच केले गेले. हायकोर्टामध्ये धरणाचे काम थांबवणारे, घळभरणी करू नये असा प्रयत्न करणारे, प्रकल्पग्रस्तांना विनाकारण उचकवून उत्तूर विभागासह कडगाव -गिजवणे विभागातील लोकांना वंचित ठेवणाऱ्यांना त्या भागातील जनता चांगलेच ओळखून आहे. लवकरच धरण पूर्ण भरेल व सर्व कार्यकर्त्यांसोबत त्या पाण्याचे दर्शन लवकरच घेऊ. तसेच, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पाण्याचे पूजन करण्याचा कार्यक्रमही संपन्न करू.

मग ‘ते’ माझे कार्यकर्ते नसतील…

मुरगूडच्या कार्यकर्त्यांनी राधानगरीच्या धरणावर गोमूत्र शिंपडून ती भूमी पवित्र करणार असल्याचा इशारा पथकाद्वारे दिलेला आहे. मात्र, राधानगरी धरणावर गोमूत्र वगैरे शिंपडणे असल्या गोष्टी करून ‘त्यांना’ प्रसिद्धीसाठी वाव देऊ नका. जे कोणी असा प्रकार करतील, ते माझे कार्यकर्ते असणार नाहीत, असा दमही ना. मुश्रीफ यांनी दिला आहे.