पुणे ( प्रतिनिधी ) गड-किल्ले ऐतिहासिक वास्तूंबद्दल नवीन पिढीमध्ये जागरुकता आणि आस्था निर्माण व्हावी तसेच नवीन पिढीमध्ये सांघिक भावना रुजावी या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांघिक किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात केली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले कि, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यातील गडकोट किल्ले हे प्रेरणा देणारे आहेत. लहान मुलांमध्ये शिवरायांचे विचार रुजावेत, त्यांना शिवरायांचे कार्य समजावे; यासाठी आगामी काळात किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांना गडकोट किल्ल्यांची मोहिम आयोजित केली जाईल, अशी घोषणा किल्ले बनवा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात केली. 

तसेच मकरसंक्रांतीचे औचित्य साधून लहान मुलांसाठी पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाईल. यावेळी 10 हजार पतंग मोफत मिळतील . मुलांनी केवळ पतंग उडविण्यासाठी यायचे आहे , असेही ‘किल्ले बनवा’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्यांनी आश्वस्त केले.

यावेळी व्यासपीठावर भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे,भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, प्रदेश चिटणीस ॲड. वर्षा डहाळे,अश्विनी ढमाले यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, किल्ला बनवा स्पर्धेतील सर्व स्पर्धक उपस्थित होते.