कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील हेरिटेज वास्तूंचे लोकसहभागातून संवर्धन व सुशोभिकरण करण्यासाठी प्राधान्याने दहा हेरिटेज वास्तूंची यादी तयार करा अशा सूचना महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी दिल्या. महापालिका हद्दीतील हेरिटेज वास्तूंचे संवर्धन व सुशोभिकरण करण्याच्या दृष्टीने स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
या बैठकीस आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पदाधिकारी, हेरिटेज कमिटी व नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते. हेरिटेज असलेल्या वास्तूंच्या परिसरातील होर्डिंग्ज काढून टाका. त्यामुळे त्या वास्तूंच्या आडव्या येणाऱ्या होर्डिंगमुळे विद्रूपीकरण होणार नाही. हेरिटेज कमिटीने दोन दिवसात याबाबतचा अहवाल दयावा. टप्याटप्याने या वास्तूंचे सुशोभिकरण करा. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या वास्तूंच्या परिसरात लाईट व साऊंड शो करा. हेरिटेज परिसरातील बांधकाम परवानगीचा अहवाल दया. स्वच्छता, डागडुजी करा. शासन स्तरावर हेरिटेज वास्तूंबाबत निधीचा पाठपुरावा करा अशा सूचना यावेळी महापौरांनी दिल्या.
स्थायी समिती सभापती सचिन पाटील म्हणाले की, हेरिटेज वास्तूंच्या परिसरात होर्डिंग्ज उभे करण्यास परवानगी देऊ नये. होर्डिंग्ज उभे केल्यामुळे या परिसराचे विद्रुपीकरण होते. या ऐतिहासिक वास्तू जतन होणे गरजेचे आहे. तर हेरिटेज कमिटीने आतापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल दयावा, अशी मागणी आयुक्त डॉ. बलकवडे यांनी केली.
या वेळी उपमहापौर संजय मोहिते, सभागृह नेता दिलीप पोवार, नगरसेवक भूपाल शेटे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, स्ट्रक्चरल ऑडिटर प्रशांत हडकर, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे, आशपाक आजरेकर आदी उपस्थित होते.