टोप (प्रतिनिधी) : मौजे वडगांव गावातील स्मशानभूमीत काही अज्ञातांनी लाल दोऱ्याने, लाल कापडात काळ्या बाहुलीला गुंडाळून बाहूलीत लिंबूवातून मोळे मारून लिंबू , नारळ, हळद कुंकू स्मशानात विस्कटुन भानामतीचा प्रकार केल्याने गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे. हा प्रकार गावातील राजकीय सत्ता संघर्षातून की अन्य अघोरी प्रकारासाठी केला असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, असाच प्रकार मागील वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीत काही भागात घडला होता.

स्मशानात अमावस्येच्या मुहूर्तावर अंधश्रद्धेपोटी काही तांत्रिक मांत्रिक अघोरी उपचार करताना या घटना समाजासाठी नविन नाहीत. पण समाजातील व्यक्तीना घाबरून सोडण्यासाठी असा फंडा अनेक जण करतात.असाच एक प्रकार हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव गावच्या स्मशानभूमीत काही अज्ञात व्यक्तींनी केला आहे.

मागील वर्षी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान गावातील अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत होत्या. पण असा प्रकार गावातील स्मशानात घडल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याचा शोध घ्यावा आणि हा अघोरी प्रकार करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.