कपिलेश्वर ( प्रतिनिधी) – राधानगरी तालुक्यातील मुसळवाडी येथील तीन घरांना आग लागून अंदाजे वीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. लक्ष्मीबाई धोंडीराम लकडे यांच्या घरातील सिलेंडर पाईपच्या गॅस गळतीमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या आगीत जीवीत हानी झालेली नाही .

मिळालेल्या माहितीनुसार , लक्ष्मीबाई लकडे आपल्या घरात दुसऱ्या माळ्यावर राहतात. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारे चुलीवर स्वंयपाक करत असताना ; काही तरी कामानिमित्ताने घराबाहेर गेल्या होत्या ; घरात चुलीपासून बऱ्याच अंतरावर गॅस सिलेंडर ठेवले होते.मात्र सिलिंडरच्या पाईप मधून गॅस गळती झाल्याने या घराला आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कांही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले . घरातून धुराचे लोट बाहेर पडताना पाहून घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या शंकरराव किरूळकर ‘ अनिल लकडे , रंगराव खाडे , यांनी आरडा – ओरडा करुन ग्रामस्थांना एकत्र केले . ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . शेजारी घराची कौले काढून आगीचा फैलाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले . अखेर भोगावती अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करून आग आटोक्यात आणली .

या आगीत लक्ष्मीबाई लकडे यांचे पत्र्याच्या पेटीत ठेवलेले सोन्या – चांदी चे दागिना ‘ चाळीस हजार रुपयाची रोकड , तसेच रविंद्र गणपती लकडे , अनिल कुंडलिक लकडे यांच्या तीन घरातील संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचे माहिती मिळताच भोगावती चे संचालक प्रा. ए.डी. चौगले राधानगरी पं.स.चे माजी सभापती रविश पाटील (कौलवकर ) दीपक पाटील , पोलीस पाटील, नितीन महाडीक यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती ची पाहाणी केली . शिरगाव येथील सागर व्हरकट , कपिल व्हरकट यांच्या पुढाकाराने नुकसानग्रस्ताना मदतीचा ओघ सुरू झाला आहे