पुणे  (प्रतिनिधी) : लष्कर भरती पेपर फुटीप्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत या गुन्ह्याचा प्रमुख सूत्रधार असलेल्या लष्कर अधिकाऱ्यास अटक केली आहे. भारतात होत असलेल्या या पेपरचा तोच भरती प्रमुख देखील होता. त्याला सिकंदराबाद येथून पकडले आहे तर त्याच्या साथीदाराला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.

भगतप्रितसिंग बेदी असे या लष्कर अधिकाऱ्याचे नाव आहे. तर त्याच्यासोबत दिल्ली येथून नारेनपाटी विरप्रसाद यालाही पकडले आहे. देशात ४० केंद्रावर आर्मी शिपाई पदाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होणार होती. मात्र, परिक्षापूर्वीच पेपर लिक होत असल्याची आर्मी इंटिलीजन्सला मिळाली होती. तर ते पुण्यातील प्रशिक्षण घेणाऱ्या केंद्र प्रमुख यांना मोठ्या किमतीला विक्री करणार असल्याचे समजले होते. त्यांनी ही माहिती पुणे पोलिसांना दिली. त्यानुसार कारवाई करत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत हे भरती रॅकेट उघडकीस आणले. यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. तर हा पेपर रद्द देखील करण्यात आला होता. अद्यापही हा पेपर झालेला नाही.

पुणे पोलीसांनी तपासात पुणे व इतर भागातील प्रशिक्षण केंद्रप्रमुख व काही आर्मीच्या लोकांना अटक केली होती. मात्र, पेपर कोठून लिक झाला हे समजू शकत नव्हते. मात्र, गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक हे या गुन्ह्याचा तपास करत होते. यावेळी A.O.C. सेंटर सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख बेदी यांच्याकडूनच हा पेपर लिक झाला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सिकंदराबाद येथून बेदी याला पकडले आहे. तर आणखी एकाच सहभाग आढळून आल्याने दिल्लीतून नारेनपाटी विरप्रसाद याला अटक केली आहे. देशात होत असलेल्या परीक्षेचा प्रमुखच या पेपर फुटीचा प्रमुख असल्याचे समोर आल्याने लष्करात खळबळ उडाली आहे. यापुर्वी पुण्याच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून किशोर गिरी (रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे), माधव गित्ते (रा. सॅपर्स विहार कॉलनी, विश्रांतवाडी), गोपाळ कोळी (रा. बीईजी सेंटर, दिघी), उदय औटी (रा. बीईजी सेंटर, खडकी) यांना आणि इतरांना अटक केली होती.

सदरील कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्हा, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक निरीक्षक संदीप बुवा, शिरीष भालेराव, सहाय्यक फौजदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, पोलिस हवालदार अतुल साठे, प्रवीण रजपूत, मधुकर तुपसौंदर, फुलपगारे, हेमा ढेंबे, पोलिस नाईक नितीन कांबळे, गजानन सोलवलकर, अश्विनी केकाण, राजेंद्र लांडगे, पोलिस कर्मचारी प्रफुल्ल चव्हाण, नितीन राव, विवेक जाधव, अमर पवार आणि पिराजी बेले यांच्या पथकाने केली आहे.