सातारा (प्रतिनिधी) : मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पर्यटनास उद्यापासून (बुधवार) परवानगी देण्यात आली आहे. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाचगणी, वेण्णा लेक येथील नौका विहार, घोडेस्वारी आणि टॅक्सी व्यवसाय सुरु होणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने काही नियमावलीही जाहीर केली आहे.

कोरोनामुळे महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळे मागील सात महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटनक नाराज होते. कोरोनाचा कहर कमी झाल्याने अनलॉक प्रक्रियेंतर्गत महाबळेश्वरमध्ये पर्यटन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने काही अटी घातल्या आहेत. वेण्णा लेक येथील नौका विहार, घोडे सवारी आणि टॅक्सी व्यवसाय सुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. तसेच पाचगणी येथेही नौकाविहार करता येणार आहे.

घोडेस्वारीसाठी वापरण्यात येणाऱ्या घोड्यांची वैद्यकीय चाचणी करणे बंधनकारक केले आहे. घोडेचालक आणि मालक या दोघांची कोरोना चाचणी केलेली असणे गरजे आहे. वेण्णा येथे नौकाविहार करायचे असल्यास एका बोटीत ६ पर्यटक आणि १ घोडेस्वार असे एकूण सात जणच बसू शकतील. बोट सॅनिटाईझ करणे बंधनकारक असेल. एका बोटीच्या दिवसभरातून फक्त दोनच फेऱ्या करण्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. जाहीर केलेल्या नियमावलीनुसार सहली अथवा ग्रुपने बोटींग करण्यास मनाई केली आहे. टॅक्सीमध्ये प्रवास करताना पर्यटकांना एका वेळी तिघांना प्रवास करता येईल. तसेच टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यात पडदा असणे बंधनकारक केले आहे.