नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थान, मध्य प्रदेश पट्ट्यात वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे राज्यातील किमान तापमानात घट नोंदवली जात आहे. मध्य महाराष्ट्रातील निवडक ठिकाणी थंडी जोर धरत असून, नाशिक आणि जळगावमध्ये हुडहुडी भरणारी थंडी होती. जळगावात किमान तापमान १२ तर नाशिक येथे किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. जळगाव येथील किमान तापमान मंगळवारी राज्यातील सर्वात कमी किमान तापमान होते.

देशाच्या वायव्य भागापासून ते मध्य भारताच्या पट्ट्यांतील किमान तापमानात चांगलीच घसरण दिसून आली आहे. राजस्थानात किमान तापमान ११ अंशापर्यंत खाली सरकले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांतील थंडीचा प्रभाव मध्य महाराष्ट्रातही दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानातील घट तीन ते पाच अंशाने कमी झाल्याचे केंद्रीय वेधशाळेने सांगितले. मराठवाड्यात औरंगाबाद तर विदर्भात यवतमाळ जिल्ह्यातही थंडीचा अलगद अनुभव येत आहे.

कोकणपट्ट्यात आर्द्रतेत घट झाल्याने आता दुपारचा प्रवासही थंडीचा अनुभव देत आहे. कोकणात केवळ डहाणू पट्ट्यात किमान तापमान आता २० अंशाखाली सरकू लागले आहे. मंगळवारी डहाणूतील किमान तापमान १९.५ अंश सेल्सिअसवर होते. मुंबईत त्यातुलनेत सांताक्रूझ येथे २१ तर कुलाब्यात २३.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली; मात्र आर्द्रतेत प्रचंड घट नोंदवली जात आहे. सांताक्रूझ येथे आर्द्रतेत ५४ कुलाबा येथे ७७ टक्के घट नोंदवली गेली. परिणामी, थंडीचा थोडाफार प्रभाव आता मुंबई, डहाणू किनारपट्टीवरही थोडा जाणवू लागला आहे.