सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण विश्ल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने. कॉंग्रेस नेते काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागेलेले असताना विशाल पाटलांच्या टीकेवर चंद्रहार पाटील यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे.

विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. दरम्यान, विशाल पाटलांनी बाकीचे सगळे उमेदवार गौण आहेत, संजय काकांना पाडू शकणारा खरा पैलवान आता निवडणुकीत उतरलाय, अशी टीका चंद्रहार पाटलांचे नाव न घेता केली होती. त्यामुळे सांगलीतील राजकीय वातावरण तापले आहे. पण आता विशाल पाटलांच्या टीकेवर चंद्रहार पाटील यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे.

मविआने उमेदवारी न दिल्याने संतापलेल्या विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. या प्रचारसभांच्या माध्यमातून ते मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत. पण त्यांच्या टीकेला आता शांत असलेल्या चंद्रहार पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विशाल पाटील ना मातीतला ना राजकारणातील पैलवान आहे. विशाल पाटील जर स्वतःला पैलवान म्हणून घेत असतील तर आम्ही पैलवानांनी आणि कुस्ती क्षेत्राने काय करावे? असा प्रश्न चंद्रहार पाटील यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

तर, मविआमध्ये बंडखोरी केल्यामुळे काँग्रेस विशाल पाटलांवर कारवाई करणार आहे. सत्ता असताना संजय पाटील यांनी आणि विशाल पाटलांनी काय विकास केला आहे, हे सर्वांना माहीत आहे. या दोघांची कामगिरी पाहता ही निवडणूक एकतर्फी आहे. विशाल पाटील हे भाजपाची टीम बी आहे. भाजपाकडून पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावर विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे. महाविकास आघाडीतून ते बाहेर पडले आहेत. ते अपक्ष उमेदवार आहे, त्यांनी बंडखोरी केले हे अजून त्यांच्या लक्षात आले नाहीये, असा सणसणीत टोलाच चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांना लगावला आहे.