गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आधीच कोरोनाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे. त्यासाठी प्रसंगी कर्ज काढू पण बळीराजाला जगवू अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथे दिली. ते पंचायत समितीत झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
अजूनही कांही भागात पाऊस तर कांही शेतात पाणी आहे. त्यामुळे सगळीकडेचं जाऊन पंचनामे करता येणार नाहीत. पण जिथं जाता येईल तिथं जाऊन नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची सूचना प्रांताधिकाऱ्यांना ना. मुश्रीफ यांनी केली. गेल्या आठवडाभरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका झाला. पण अजूनही लस उपलब्ध नसल्याने धोका पूर्ण टाळला असे म्हणता येणार नाही. येणाऱ्या दसरा आणि दिवाळीत आपण योग्य काळजी घेऊन कोरोनाला रोखू शकलो तर यामध्ये यश आले असे म्हणता येईल. शिवाय डिसेंबर अखेर लस उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने त्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येईल असा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
गेल्या सहा महिन्यात जीवाची बाजी लावून कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या सर्व शासकीय कर्मचारी, आरोग्य यंत्रणेचे मुश्रीफ यांनी कौतुक केले. तसेच कोरोनातून बरे होऊन बाहेर पडलेल्या रुग्णांना आरोग्यविषयक अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्याबाबत अशा रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्याची सूचनाही आरोग्य यंत्रणेला मुश्रीफ यांनी केली.
यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी, प्रांताधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, सहायक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर आदिंसह अन्य शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.