कागल (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणूक आणि इतर राज्यांच्या पोटनिवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. या यशाची परंपरा पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख यांना विजयी करून कायम राखूया, असे आवाहन खासदार सुजय विखे-पाटील यांनी केले. कागल येथे आयोजित भाजपच्या पदवीधर मतदार आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी खा. विखे-पाटील म्हणाले की, भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. त्याची सुरूवात कोल्हापूरमधून अधिक मताधिक्य देऊन करा.

भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले की, भाजपने कोल्हापूर जिल्ह्यात पदवीधर मतदार नोंदणीपासून आघाडी घेतली आहे. कागल तालुक्यात जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी एक मत, एक कार्यकर्ता नियुक्त केला आहे. भाजपला मत देण्यासाठी मतदारांना ते प्रवृत्त करतील.

यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, युवराज पाटील, बॉबी माने, राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी.पाटील, मारूती निगवे, भूपाल पाटील, मारूती पाटील, सचिन मगदूम, राजेंद्र जाधव, नंदकुमार माळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.