कळे (प्रतिनिधी) :  कुंभारवाडी (ता.पन्हाळा) येथे गोठ्यात असणाऱ्या वासरावर बिबट्याने हल्ला केला.यामध्ये वासराचा मृत्यू झाला असून बिबट्याच्या पुन्हा वावराने परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुंभारवाडी येथील गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर निवृत्ती भिकाजी भवड यांचे घर आहे. घराच्या मागील बाजूस जनावरांचा गोठा आहे. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे ते घराचा दरवाजा बंद करुन झोपी गेले.शनिवारी (दि.१३) रोजी पहाटे‌ पाचच्या सुमारास धार काढण्यासाठी गोठ्यात गेले असता वासरू दिसले नाही. त्यांनी शोध घेतला असता रक्त पडलेले दिसले. त्यांनी लोकांना बोलावून गोठ्याच्या मागील बाजूस पाहणी केली असता काही अंतरावर ऊस शेतीत अर्धवट खाल्लेल्या अवस्थेतील वासरू दिसुन आले. याबाबत भवड यांनी वनविभागाला याची माहिती दिली.

यावेळी वनविभागाच्या रेस्क्यू टीमचे वनरक्षक स्वप्नील काशीद, वनपाल एन.एस.पाटील यांनी पाहणी करून नुकसान भरपाई बाबत पंचनामा केला. तर तो प्राणी बिबट्याच असल्याचा दुजोरा त्यांनी दिला. तसेच शिकार केलेल्या ठिकाणी कॅमेरा लावणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.