कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरफोड्या करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून अटक केली. हर्षवर्धन सुरेश पाटील (वय २४) व तेजस तानाजी पाटील (वय २२, दोघे रा. नेज शिवपुरी ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. आज (बुधवार) सकाळी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, मोटारपंप, दोन मोबाईल व एक मोटारसायकल असा सुमारे बारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हातकणंगले तालुक्यातील बाहुबली येथे येथे घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला होता. त्याच्या तपासासाठी कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तयार केले होते. बाहुबली येथील ही चोरी नेज शिवपुरी येथील हर्षवर्धन पाटील व तेजस पाटील यांनी केली असून ते चोरीतील सोन्याचे दागिने इचलकरंजी येथे विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून या दोघांना अटक केली. त्यांनी बाहुबली येथील घरफोडीसह आळते (ता. हातकणंगले) येथील मोटर पंप व केबल चोरल्याची कबुली दिली.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सपोनि. सत्यराज घुले, संतोष पवार सहायक फौजदार चंद्रकांत ननवरे यांनी ही कारवाई केली.