पुणे (प्रतिनिधी) : ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला दिलेला राज्य पुरस्कार रद्द केल्यानंतर सुरू झालेल्या राजीनामा सत्राचा सिलसिला बुधवारीही कायम राहिला. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी पुरस्कार रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करत आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या भूमिकेला समर्थन देत समितीचे सदस्य डॉ. विवेक घोटाळे यांनीही राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे पुस्तक मी वाचले असून, त्यात आक्षेपार्ह काही नाही, असे लेखक म्हणून माझे मत आहे. मूळ इंग्रजी पुस्तकात आणि मराठी अनुवादात नक्षलवादाचे उदात्तीकरण आणि हिंसेचा पुरस्कार लेखकाने केलेला नाही. या पुस्तकावर केंद्र किंवा राज्य सरकारने आजवर तरी बंदी घातलेली नसून ते दोन वर्षांपासून बाजारात उपलब्ध आहे. त्याचा मराठी अनुवादही सहा महिन्यांपासून राज्यभर विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा पुरस्कार मूळ पुस्तकाला नाही, तर उत्तम अनुवादाला असतो. त्यामुळे पुरस्कार रद्द करण्याची कृती केवळ अनुचितच नाही, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मौलिक संविधानिक मूल्यांशी प्रतारणा करणारी आहे. तिचा मी तीव्र निषेध करत आहे, असे देशमुख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.