हलकर्णी (प्रतिनिधी) : हिमाचल प्रदेश येथे सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेल्या नंदनवाड येथील जवान अविनाश आप्पासाहेब कागीनकर यांना ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी जड अंतकरणाने अखेरचा निरोप दिला.

जवान अविनाश यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील आप्पा कागीनकर यांनी त्यांच्या चितेस भडाग्नी दिला. त्यावेळी आई सुवर्णा, भाऊ वैभव, पत्नी राजलक्ष्मी यांच्यासह नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

सकाळी साडेनऊ वाजता अविनाश यांचे पार्थिव नंदनवाडमध्ये आणण्यात आले. तेथून सजवलेल्या ट्रॅक्टरमधून ग्रामस्थांनी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. आदिती फाउंडेशनच्या संस्थापक दिनकर सावेकर यांनी या अंत्यविधीसाठी एक लाख रुपयांची देणगी दिली. सीमेपासून ते पूर्ण गावात रांगोळी, डिजिटल व स्वागत कमानी उभारून अंत्ययात्रेची जय्यत तयारी केली होती. रामलिंग मंदिराशेजारील गायरानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. भारतीय सैन्यात आर्मी सप्लाय कोअर सेंटरमध्ये त्यांनी सात वर्षे सेवा बजावली होती.

प्रथम पार्थिव अविनाशच्या घरी व नंतर गायरान येथील दहनस्थळी आणण्यात आले. भारत माता की जय..!, अविनाश कागीनकर अमर रहे….! अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी १८५४ कोअर बटालियन धर्मशाला सेंटरचे सुभेदार व्ही. राजेंद्रन, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक शीतल शिसाळ, जिल्हा सैनिक बोर्डाचे चंद्रशेखर पांगे, संतोष पाटील, नागेश चौगुले, विद्याधर गुरबे, रियाज शमनजी, गंगाधर व्हसकोटी, बाळेश नाईक,  सरपंच शेवंता मगदूम, भारती रायमाने आदींनी पुष्पचक्र अर्पण करुन अविनाश यांना श्रद्धांजली वाहिली. डॉ. घाळी व शिवराज महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी परिश्रम घेतले.

यावेळी रेखाताई हत्तरकी, उपसरपंच बाबू केसरकर, तायगोंडा बोगरनाळ, मंडल अधिकारी विजय कामत ग्रामसेवक दत्ता पाटील,  आनंदा वाघराळकर, महाबळेश्वर कापसे, राजेश चव्हाण गावातील आजी-माजी सैनिक यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. अविनाशची पत्नी राजलक्ष्मी हिच्या कपाळावरील कुंकू अबाधित ठेवून गावात ‘विधवा प्रथा’ बंद करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. आजी माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक व ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांनी गावात विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची घोषणा अविनाशच्या अंत्यसंस्कारप्रसंगी करण्यात आली.