कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्रिडाई महाराष्ट्र ही बांधकाम व्यावसायिकांची राज्यव्यापी संघटना असून मुंबई वगळता महाराष्ट्रातील ५७ शहरांमध्ये जवळपास ३००० सभासद कार्यरत आहेत. या संस्थेची स्थापना होऊन २५ वर्षे पूर्ण झाल्याने यंदाचे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. याबद्दलची माहिती क्रिडाई महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष राजीव परीख, मानद सचिव, सुनील कोतवाल आणि कार्यकारणी सदस्य सर्वश्री गिरिष रायबागे, महेश यादव यांनी दिली.

या राज्यव्यापी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण आज (रविवार) दि. २७ सप्टेंबर रोजी कोरोनामुळे ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये क्रिडाई नॅशनल या देशव्यापी संघटनेचे अध्यक्ष सतीश दादा मगर, उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया आणि कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर यांचे बांधकाम व्यवसायाशी निगडित विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.

या सभेला राज्यभरातून १ हजार पेक्षा जास्त सभासदांची नोंदणी झाली आहे. सभेमध्ये नवीन बांधकाम नियमावली, स्टॅम्पड्युटी मधील सवलत, रेडीरेकनर मधील दरवाढ, जीएसटीमधील सवलती, या महत्त्वांच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जाणार आहेत. क्रिडाई महाराष्ट्र या नामांकित बांधकाम व्यवसायिक संघटनेला महारेराकडून ‘सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन’ हा राज्यातील प्रथम मान प्राप्त झाला असून संघटनेमार्फत प्रमुख शहरांमध्ये ग्राहकांसाठी सामोपचाराने तक्रार निवारण केंद्रे स्थापन केलेली आहेत. त्याचबरोबर कोविडच्या राष्ट्रीय संकटामध्ये सर्वच शहर संघटनांनी सामाजिक बांधिलकीतून भरीव कार्य केले आहे. वादळ आणि पूरपरिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तीवेळी क्रिडाई सभासदांकडून आपत्ती निवारणाचे मोठे कार्य केले गेले आहे.

वार्षिक सभेमध्ये मागील २५ वर्षांमध्ये संघटना उभारणीचे कार्य केलेल्या आणि संघटनेच्या वाटचालीत सिंहाचा वाटा असलेल्या सर्व माजी अध्यक्षांचा सत्कार करायचे ठरले आहे. त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष रामकुमार राठी, जितेंद्र ठक्कर, रामचंद्र पाटणकर (कोल्हापूर), राजिंदरसिंह जबिंडा, किशोर चांडक, संतदास चावला, सतीशदादा मगर, अनंत राजेगावकर, प्रशांत सरोदे, शांतीलाल कटारिया या अध्यक्षांचा समावेश आहे. या प्रसंगी क्रिडाई समूहात शिरपूर (जिल्हा धुळे) या ५७ व्या नवीन सिटी चाप्टरचा समावेश हा एक मानाचा तुरा ठरणार आहे.