कळे (प्रतिनिधी) : कोरोना काळात प्राणपणाला लावून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम केले. मात्र, दोन वर्ष पूर्ण झाले तरीही पूर्ण मानधन मिळाले नाही. आरोग्य विभागाला त्याचा जणू विसरच पडला आहे. आजही हे कर्मचारी मानधनाच्या प्रतिक्षेत असून आरोग्य विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. कोणी मानधन देता का मानधन ? अशी म्हणण्याची त्यांच्यावरती वेळ आली आहे.

२०२०-२०२१ च्या कोरोनाच्या लाटेत कोविड केंद्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशनानुसार तहसीलदारांकडून कंत्राटी तत्वावर आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. कोरोनाकाळात सुमारे साडेआठशे कर्मचाऱ्यांनी आपली सेवा दिली होती. पहिल्या व दुसऱ्या लाटेतील काही महिन्यांचे सुमारे चौदा कोटी रुपयांचे मानधन थकीत आहे. ३१ ऑगस्ट २०२३ला. दोन वर्ष पूर्ण झालीत तरीही अद्याप मानधन मिळालेले नाही.

कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून जिल्ह्यातील विविध भागातील कोविड केंद्रामध्ये काम केलेले कंत्राटी आरोग्य कर्मचारी याचा पाठपुरावा करत आहेत. परंतु त्यांच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला जात आहे. या संदर्भात तहसीलदार पासून मुख्यमंत्री यांना अर्ज, निवेदने देण्यात आली आहेत. काही पक्ष आणि संघटनातर्फे मोर्चेही काढण्यात आले होते.

पाठपुराव्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण शासनास पाझर फुटत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने तातडीने निधीचा पुरवठा करुन प्रलंबित मानधन द्यावे, अशी मागणी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांतून होत आहे.