कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू झाली आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी कागदोपत्री लढत होणार असली, तरी पालकमंत्री सतेज पाटील आणि महाडिक कुटुंबातील अंतर्गत संघर्ष हाच लढतीचा मुद्दा अधोरेखित असणार आहे. विधान परिषदेची निवडणूक म्हणजे एक जुगार आहे. त्यात मतदार हरणार नाहीत, तर मालामाल होणार हे नक्की…

विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदारांची संख्या अगदीच खूप कमी असते. मोजक्या मतदारांमुळे त्यांना हाताळणे खूप सोपे असते. अर्थात उमेदवाराला त्यासाठी हात मोकळे सोडावे लागतात. सगळा मामला पैशाचा आणि इर्षेचा असतो. हात इतका मोकळा सोडावा लागतो, की ते ऐऱ्या-गैऱ्याचे काम नाही. ही निवडणूक म्हणजे सिंपथी आणि संपत्तीची निवडणूक असते, हे उघड गुपित आहे. कोल्हापुरात दोन्ही उमेदवार आर्थिकदृष्टया संपन्न आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्यात राजकीय आणि वयक्तिक टोकाची ईर्षा आणि संघर्ष आहे.

त्यामुळे या निवडणुकीतील मतदारांना अक्षरश: जीवाची मुंबई करता येणार आहे. ही निवडणूक डिसेंबर महिन्यात होत आहे. त्यामुळे सांताक्लॉज त्यांच्यावर प्रसन्न होणार हे नक्की आहे. मतदारांना कोरोनामुळे सर्वांचीच मोठी अडचण झाली होती. त्यामुळे घरात बसून कंटाळला असाल, तर आता श्रमपरिहार करा, जीवनाची एैश करा,  फिरा, सांताक्लॉज तुम्हाला भरभरून देईल, असे उघडपणे म्हणू लागले आहेत. याचाच अर्थ या निवडणुकीत किती मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे, हे कुणी तज्ञांनी सांगण्याची गरज नाही.

एकीकडे सर्व सामान्य माणूस कोरोना, अतिवृष्टी, महापूर, महागाई, इंधन दरवाढ अशा अनेक कारणांनी पिचला आहे. त्यांच्यासाठी कुठलाच सांताक्लॉज पुढे येत नाही. त्यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. याची पर्वा कुणालाच नाही. पण, या राजकारणाला सध्या तरी चांगलीच उकळी फुटली आहे.

जुगार तसा वाईटच पण, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने खेळला जात असलेला जुगार जरा वेगळा आहे. यात सहभागी होणारे हरणार नाहीत, उलट मालामाल होणार आहेत. त्यामुळे अनेक मतदार सध्या स्वप्नातच दंग आहेत. परंतु, या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेच्या निवडणुकीची आठवण आल्याशिवाय रहात नाही.

आमचं ठरलंय, असं म्हणत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत न करता सेनेच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका घेणाऱ्यांना, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तुमचं ठरलंय, तर आम्ही ध्यानात ठेवलंय, असं उत्तर दिलं होतं. त्याचा काय परिणाम या निवडणुकीत दिसणार का ? अशी शंका अनेकांना आहे. आक्रमक भाजपाला संधी मिळू नये, म्हणून काही नेते मवाळ भूमिका घेणार का ? असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

त्यामुळे शेवटी जुगारच खेळायचा आहे, म्हटल्यावर सगळंच गृहीत धरायला हवं. आपण सामान्य माणसं उघड्या डोळ्यांनी थोरा मोठयांचा जुगार बघण्याखेरीज आणखी काय करू शकतो. जिकडं खोबरं तिकडं चांगभलं म्हणून गप्प बसायचं. बरोबर ना ?

…आपला ठसकेबाज.