कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी येथील मुनिसुव्रत प्लाझा या इमारतीमधील तळ मजल्यावर विनापरवाना सुरु असलेल्या चार ऑनलाईन कॅसिनोंवर कारवाई करत ते सील बंद करण्यात आले असल्याची माहिती करमणूक कर अधिकारी सैपन नदाफ यांनी दिली आहे.

विनापरवाना गेम सुरु असल्याबाबतची माहिती करमणूक कर अधिकारी सैपन नदाफ यांना प्राप्त झाली होती. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी तहसिलदार तथा करमणूक कर अधिकारी, सैपन नदाफ, सहा करमणूक अधिकारी नितीन धापसे पाटील व करमणूक कर निरीक्षक अनिल शिंदे, राहुल अशोकराव शिंदे, उल्हास कांबळे, प्रकाश जाधव, प्रकाश कुंभार, शैलेश उंडाळे, रामचंद्र गावडे व निलेश पाटील यांच्या पथकाने कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी येथील मुनिसुव्रत प्लाझा या इमारतीमधील तळ मजल्यावर विनापरवाना सुरु होती.

मदन कुंडलीक कुलकर्णी रा. एस.एस.सी. बोर्ड, अरिहंत प्लाझा कोल्हापूर, समर्थ नारायण पाटील रा.बाचणी, ता.कागल यांचा महादेव ऑनलाईन गेम, रोहीत म्हेतर रा. बोरिवडे, ता. पन्हाळा यांचा श्री एंटरप्रायझेस ऑनलाईन गेम व लॉटरी व श्री सागर गोरे यांचे ऑनलाईन गोवा कॅसिनो खेळगृह सध्या श्री शैलेश चव्हाण रा. आयसोलेशन हॉस्पिटल, चिले कॉलनी, कोल्हापूर यांच्या ऑनलाईन कॅसिनो गेम या खेळगृहाची अचानक तपासणी केली असता संबंधीतांकडे कोणत्याही विभागाचे परवाने नसल्याचे आढळून आले.

खेळगृह सुरु करावयाचे असल्यास त्याबाबत रितसर जिल्हा दंडाधिकारी कोल्हापूर यांची परवानगी घ्यावी लागते, कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी येथील मुनिसुव्रत प्लाझा येथील चार ऑनलाईन गेम ची खेळगृहे परवानगी न घेता बेकायदेशीररित्या सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने खेळगृहावर कारवाई करुन खेळगृह सिलबंद केले आहेत.

जिल्हयामध्ये करमणूक विभागाकडून देण्यात आलेल्या कोणत्याही खेळगृहाचे परवाने संबंधितांना मंजूर करण्यात आलेल्या पत्यावर असणे आवश्यक असून करमणूक कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना सुरु केले असल्यास अथवा अटी व शर्तीचा भंग केलेबा बतची कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधीतांवर कारवाई नियमांनुसार करण्यात येईल. बेकायदेशीररित्या सुरु असलेली ऑनलाईन खेळगृहे आढळून आल्यास नागरिकांनी करमणूक कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन करमणूक कर अधिकारी सैपन नदाफ यांनी केले आहे.