टोप (प्रतिनिधी) : सार्वजनिक क्षेत्रातील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) ने त्यांच्या म्हैसूर प्लांटमध्ये लष्करी रणगाडासाठी स्वदेशी निर्मित १५०० एचपी इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे. नव्या इंजिनासाठी आवश्यक असणारे सिलिंडर हेड हे कोल्हापुरातील शिरोली औद्योगिक वसाहतीतील नामांकित मे. सरोज आयर्न यांनी विकसित केले असून यासाठी या उद्योग संस्थेचे संचालक दीपक जाधव आणि भरत जाधव यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

संरक्षण सचिव गिरीधर अरमाणे यांनी बीईएमएलच्या इंजिन डिव्हिजनमध्ये बीईएमएलचे सीएमडी शंतनू रॉय, भारतीय सशस्त्र सेना आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) चे उच्चपदस्थ अधिकारी, उद्योग भागीदार आणि उच्च पदस्थ अधिकारी यांच्या उपस्थितीत चाचणी केली गेली.

यावेळी गिरीधर अरमाणे म्हणाले की, १५०० एचपी इंजिन विकास प्रकल्प हा आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण वाटचाल आहे. लढाऊ रणगाडासाठी भारतातील पहिल्या स्वदेशी निर्मित प्रोटोटाइप १५०० एचपी इंजिनची रचना आणि प्रत्यक्ष निर्मिती करणे, ही उल्लेखनीय कामगिरी भारताच्या संरक्षण क्षमतांमध्ये एका नवीन पर्वाचा शुभारंभ करते, देशाच्या अभियांत्रिकी पराक्रमाचे आणि संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेची वचनबद्धता दर्शवते.

विशेष बाब म्हणजे या नव्या इंजिनासाठी आवश्यक असणारे सिलिंडर हेड हे कोल्हापुरातील जेष्ठ उद्योजक कै. बापूसाहेब जाधव यांच्या शिरोली औद्योगिक वसाहतीतील नामांकित मे. सरोज आयर्न यांनी विकसित केले असून यासाठी या उद्योग संस्थेचे संचालक दीपक जाधव आणि भरत जाधव यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच कोल्हापूरचे उद्योजक रवी मुळीक यांच्या मे. रवी कॅम यांनीही सदरच्या इंजिनासाठी कॅम शॅफ्ट बनविले असून त्यांचाही याठिकाणी सत्कार करण्यात आला. सदरची बाब कोल्हापूरच्या लौकिकात निश्चितच भर घालणारी ठरणार आहे.