कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाणीबिल वसुलीवर महापालिका प्रशासनाने भर दिला असून मागील दहा दिवसात पाणीपुरवठा विभागाच्यावतीने १ कोटी ४२ लाख ५२ हजार ३९० रुपयांची वसुली केली आहे. नागरिकांनी पाणीबिलाची रक्कम मुदतीत भरावी, अन्यथा कनेक्शन बंद करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिला.

डॉ. बलकवडे म्हणाल्या की,  यंदा पाणीबिल व सांडपाणी अधिभार असे मिळून ६८ कोटी ५० लाखांचे उदिदष्ट पाणीपुरवठा विभागास दिले आहे. तथापि, आतापर्यंत केवळ २४ कोटी २४ लाख ७४ हजारांची वसुली झाली आहे, उर्वरित वसुली मार्च २०२१ पर्यंत करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. पाणीबिलाच्या वसुलीसाठी आतापर्यंत सुमारे १२ हजार थकबाकीदारांना नोटिसा देऊन पाणी कनेक्शन तोडण्याची सूचना दिली आहे. तसेच चोरून अथवा अनधिकृतपणे पाणी वापर करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देशही संबंधितांना दिले आहेत.

सर्व संबंधित शासकीय कार्यालयांनी त्यांची थकीत पाणीबिलाची रक्कम तत्काळ भरुन महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी  केले आहे.