कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मोठी झेप घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये बँकेने ठेवींचा सहा हजार कोटींचा टप्पा यशस्वीरीत्या पार करीत, या बँकेच्या ठेवी एकूण ६,०९८ कोटींच्या घरात गेल्या आहेत. बँकेने कर्ज वाटपातही साडेचार हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या पत्रकात म्हटले आहे की, सप्टेंबर महिनाअखेरीस नफा-तोटा, सीआरएआर, एनपीए, कर्मचाऱ्यांच्या देय रक्कमा इत्यादी तरतुदी न केल्यामुळे रेशो अंतिम केले जात नाहीत. कारण, आता बँकेने स्वीकारलेल्या संगणकीय प्रणालीमुळे आर्थिक पत्रके निश्चित होत आहेत. बँकेची गेल्या आर्थिक वर्षाअखेरची म्हणजेच मार्चअखेरची स्थिती विचारात घेऊनच एनपीए, थकव्याज, घसारा व कर्मचाऱ्यांच्या देय रक्कमा इत्यादींच्या तरतूददी केल्या जातात. त्यामुळे नफा निश्चित होत नाही. मात्र, पहिल्या सहामाहीत कोविड -१९ च्या काळातही रिझर्व बँकेने सवलतीचा कालावधी दिलेला होता. असे असतानाही विकास सेवा संस्था सभासद, बिगर शेती संस्था व व्यक्ती यांनी याचा लाभ न घेता वेळोवेळी व्याजासह कर्जाचे हप्ते नियमित भरलेले आहेत. हे सर्वजण बँकेकडून कौतुकास आणि आभारास पात्र आहेत.
मार्च २०२० पासून कोविड महामारीचा संसर्ग सुरू झालेला आहे. एप्रिल २०२० पासून खरीप कर्जवाटपास सुरुवात होऊन जून महिन्याच्या अखेरीस उद्दिष्टाच्या दुप्पट म्हणजे २०८ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. जून महिन्याच्या अखेरीस पीक कर्जाची वसुलीही गेल्यावर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी वाढून ती ९० टक्के झाली आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून १५४ कोटी रुपये, अतिवृष्टी व महापूरबाधीत आर्थिक मदत अनुदानामधून २५८ कोटी ४६ लाख रुपये, असे एकूण एक लाख १८ हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खाती एकूण ४१२ कोटी १७ लाख रुपये रक्कम जमा झाली आहे. याशिवाय, साखर कारखान्यांनीही दरमहा व्याजाची रक्कम भरपाई केली आहे. तसेच व्यक्ती कर्जदारांनीही त्यांचे ईएमआय नियमित भरले आहेत.
दरम्यान, तोंडावर आलेला साखर हंगाम व पिकांचाही दर्जा उत्तम असल्यामुळे पुढील सहा महिन्यांमध्येही म्हणजेच ३१ मार्च २०२१ अखेर बँकेचा हा नफा निश्चितपणे नेत्रदीपक राहील. आजपर्यंत खातेदारांनी बँकेच्या या वाटचालीत केलेल्या योगदानाबद्दल बँक सर्वांची ऋणी असल्याचे डॉ. ए. बी. माने यांनी सांगितले.