नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांना इतर मान्यवरांप्रमाणे अयोध्येतील राम मंदिरातील भगवान श्री रामांच्या अभिषेकचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. यामध्ये अयोध्येबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देणार्‍या खंडपीठात सरन्यायाधीश होते. मात्र सरन्यायाधीश चंद्रचूड आपल्या कामात व्यस्त आहेत.

आज सकाळी 10 वाजता न्यायालय उघडले तेव्हा मुख्य न्यायाधीश चंद्रचूड एका खटल्याच्या सुनावणीसाठी बसलेले दिसले. त्यामुळे चंद्रचूड यांच्यासाठी कर्म हीच पूजा असल्याचं स्पष्ट झालं. केंद्र सरकारने आज अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय अनेक राज्यांमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त सुट्टी आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात आज सुट्टी नाही. सरन्यायाधीश चंद्रचूड आणि इतर न्यायाधीश खटल्यांच्या सुनावणीत व्यस्त होते.

सुप्रीम कोर्टाने 2019 मध्ये राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला होता. हा निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एसए बोबडे, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश होता. या सर्व न्यायाधीशांना राम मंदिर ट्रस्टकडून प्राण प्रतिष्ठामध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले होते.