कागल (प्रतिनिधी) : कागल येथील सागर दावणे या कार्यकर्त्यांने आपल्या रक्ताने साकारलेले चित्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्या कार्यकर्त्यांचे आपल्यावरील जिवापाड प्रेम पाहून ना. मुश्रीफही भावूक झाले.

यावेळी ना. मुश्रीफ म्हणाले, कार्यकर्त्यांचे स्थान नेहमीच माझ्या हृदयात राहिलेले आहे. जीवाला जीव देणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच अनेक आव्हाने सहज पार करत आलो आहे. अशा सर्वच कार्यकर्त्यांचा मी नेहमीच ऋणी राहणार असल्याचे म्हणाले.

दरम्यान, सागर दावणे या कार्यकर्त्यांने आपल्या छातीवर आणि दंडावरही पालकमंत्री मुश्रीफ यांच्या छायाचित्राचे गोंदण करून घेतलेले आहे. सागरने आपल्या घराला “मुश्रीफ एके मुश्रीफ” असेच नामकरण केले आहे. तसेच मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडली त्यावेळी सागर दावणे यांने ईडीच्या अधिकार्यासमोर आपले डोके आपटून रक्तबंबाळ होत त्यांचा निषेध व्यक्त केला होता. यावेळी तो रक्तबंबाळ झाल्याने उपस्थित कार्यकर्त्यांनीही ईडीबाबत संताप व्यक्त केला होता.