कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना आज (सोमवार) अनुकंपा अंतर्गत नोकरीची नियुक्ती पत्रे व विमा धनादेशांचे वाटप झाले. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीमध्ये मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.

केडीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास बँकेने २१ लाख रुपये विमासुरक्षा कवच व संबंधित कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी कल्याण निधीमार्फत दोन लाखाच्या विमा सुरक्षेची तरतूद केलेली आहे. त्याअंतर्गत श्रीमती सुमय्या मुनीरअहमद बाणदार (रा. जयसिंगपूर) व ओंकार भीमराव कणेरकर (रा. सातवे) या वारसदारांना धनादेशांचे वाटप झाले. तसेच तुषार तुकाराम पाटील (रा. असंडोली), पूजा शीतल उपाध्ये (रा. उमळवाड), सौरभ आबाजी एकशिंगे (रा. केनवडे), धनराज माधवराव रणनवरे (रा. कडगाव), अभिजित कुमार पाटील (रा. जयसिंगपूर), शाहरुख याकूब नदाफ (रा. कसबा सांगाव), ओंकार कणेरकर व श्रीमती सुमय्या बाणदार यांना अनुकंपा अंतर्गत बँकेच्या नोकरीच्या नियुक्ती पत्रांचेही वितरण झाले.

ग्रामविकास मंत्री ना. मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या महामारीतही केडीसीसी बँकेने ग्राहकांना तत्पर सेवा अखंडपणे दिलेली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी बँक हिमालयासारखी उभी आहे.

या वेळी सर्व संचालकांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.