कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेला शब्द न पाळता सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. ही फसवणूक थांबवावी व तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज कोल्हापूर मिरजकर तिकटी येथे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आमच्या मागण्या मान्य करा अथवा 24 ऑक्टोबरनंतर समाजाचा रोष सरकारला महागात पडेल, असा इशारा दिला.


यावेळी आंदोलकांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार टाळाटाळ करत असून, याचा निषेध म्हणून आज सकल मराठा समाजाने कोल्हापूर येथील मिरजकर तिकटी परिसरात जेलभरो आंदोलन केले. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’ ‘या सरकारचं करायचं काय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनात विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावत सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सकारात्मक असल्याची भुमिका घेतली. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष आर.के.पोवार म्हणाले, सरकारला आरक्षण द्यायचे नसल्यानेच ते चालढकल करत आहेत.

सरकार सोंग करत असून त्यांना जागे करण्यासाठी जेलभरो आंदोलन केले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आदिल फरास म्हणाले, सरकार कुणाचेही असो, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्याविरोधात संघर्ष करू. यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.