मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगर आणि संपूर्ण राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. पुढील तीन दिवस पाऊस थैमान घालणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

पाऊस परतीच्या मार्गावर आहे. अशातच देशातील अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मेघालय, आसाम. नगालँड, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये दोन ऑक्टोबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अंदमान निकोबार द्वीप समूहात देखील मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान विभागाच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

भारतीय हवामान विभागानुसार शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. शनिवारी कोकण, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, ठाणे जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.