जम्मु ( वृत्तसंस्था ) लष्कराच्या जवानांनी उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील मछल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. ही घटना आज गुरुवार दिनांक 26 आक्टोबर रोजी घडली आहे. यावेळी दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक उडाली आहे या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे गस्त घालणाऱ्या सैनिकांना घुसखोरी झाल्याचे दिसले यावेळी तातडीने इतर साथीदारांना याबाबत सतर्क करत दहशतवादी मारण्याची मोहीम सुरू केली. दरम्यान जवानांची हाक ऐकताच दहशतवादी पुन्हा गुलाम काश्मीरच्या दिशेने पळू लागले.

तर यावेळेला सैनिकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आणि त्यांचा पाठलाग करण्यापासून रोखण्यासाठी दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला मात्र त्यांचा प्रयत्न फसला असून, दोघांना ठार करण्यात लष्कराला यश आलं आहे.

दरम्यान इतर घुसखोरांविरुद्ध लष्करी कारवाई सुरूच ठेवण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात उत्तर काश्मीरमध्ये घुसखोरीची ही दुसरी घटना आहे. याआधी रविवारी लष्कराच्या जवानांनी उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसवून दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.