नवी मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय महिला संघानं इंग्लंडचा ३४७ धावांनी पराभव करून महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला. हा सामना जिंकण्यासाठी भारतानं इंग्लंडला ४७९ धावांचं मोठं लक्ष्य दिलं होतं. याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १३१ धावांवर गारद झाला. भारतीय महिला संघाचा इंग्लंडविरुद्धचा हा एकूण तिसरा तर मायदेशातील पहिला विजय आहे.

नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या एकमेव कसोटीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने सामन्याच्या तीनही दिवस इंग्लिश संघावर वर्चस्व गाजवलं. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात ४२८ धावा ठोकल्या. पहिल्या डावात भारताच्या शुभा सतीश (69), जेमिमा रॉड्रिग्ज (68), यास्तिका भाटिया (66) आणि दीप्ती शर्मा (67) यांनी अर्धशतक झळकावले. दुसऱ्या डावात हरमनप्रीत कौरने नाबाद 44 आणि शफाली वर्माने 33 धावा केल्या. इंग्लंडचा पहिला डाव १३६ धावांत आटोपला.

भारतानं इंग्लंडवर २९२ धावांची मोठी आघाडी घेतली. भारताला इंग्लंडला फॉलोऑन देण्याची संधी होती, पण संघानं तसं केलं नाही. कर्णधार हरमननं पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या दुसऱ्या डावात ६ बाद १८६ धावा करून डाव घोषित केला.पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर हरमनप्रीत सेनेनं इंग्लंडसमोर ४७९ धावांचे लक्ष्य ठेवलं. पण इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १३१ धावांवर गारद झाला. दीप्ती शर्माच्या फिरकीपुढे इंग्लंडचा संघ काहीच खास करू शकला नाही. पहिल्या डावात 5.3 षटकं टाकत दीप्तीने 7 धावा दिल्या आणि 5 गडी बाद केले. त्यानंतर दुसऱ्या डावात 8 षटकात 32 धावा देत 4 गडी बाद केले. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. 1998 मध्ये श्रीलंकन महिला संघाने पाकिस्तानला 309 धावांनी पराभूत केलं होतं. आता हा विक्रम भारताने मोडीत काढला आहे. इंग्लंड महिला संघाला 347 धावांनी पराभूत केलं आहे. यापूर्वी भारतानं २००६ मध्ये टॉटन आणि २०१४ मध्ये वर्म्सले इथं इंग्लंडला मात दिली होती.