नेपियर (वृत्तसंस्था) : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० असा विजय मिळवत मालिका खिशात घातली. पावसामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार सामना बरोबरीत सुटला. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा भारताने ९ षटकांत ४ गडी गमावून ७५ धावा केल्या होत्या. दरम्यान, सामना टाय झाल्यावर सुपर ओव्हर होत असते; पण एकही चेंडू टाकायला वाव नसल्याने अशा स्थितीत सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला.

न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार केन विलियम्सन दुखापतीमुळे आजचा सामना खेळू शकला नाही. त्याच्या ऐवजी मार्क चॅपमनला संघात स्थान देण्यात आले होते. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंड संघाने १६० ही सन्मानजनक धावसंख्या उभारली होती.

न्यूझीलंडने ठेवलेल्या १६१ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ईशान किशन, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर स्वस्तात माघारी परतले. ईशान आणि पंतने अनुक्रमे १० आणि ११ धावा केल्या. श्रेयस अय्यरला भोपळाही फोडता आला नाही. न्यूझीलंडच्या कर्णधार टीम साऊदीने २ गडी बाद केले. त्यानंतर भारताचा ‘द- स्काय’ सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांनी धुव्वाधार फलंदाजी करत पॉवर प्लेमध्ये ५७ धावा केल्या. पण मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार बाद झाला. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि शेवटी सामना तिथेच थांबविण्यात आला. नऊ षटकात ७६ धावांची गरज असताना भारताच्या ७५ धावा झाल्या होत्या.

तत्पूर्वी, न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स या दोन खेळाडूंव्यतिरिक्त कोणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावर दबाव आणत शेवटच्या पाच षटकात ३० धावांत तब्बल ८ गडी बाद केले. या दोघांच्या जोरावरच  न्यूझीलंडला दीडशे धावांचा आकडा पार करता आला.

भारताकडून अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज या दोन गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले. दोघांनीही प्रत्येकी ४ गडी बाद करत आपल्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला. डावखुरा गोलंदाज अर्शदीपने ४ षटकात ३७ धावा देत ४ बळी घेतले. त्याला, हर्षल पटेल याने १ गडी बाद करत मोलाची साथ दिली.