कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेचा घरफाळा, पाणीपटटी, नगररचना, इस्टेट, परवाना, अग्निशमन विभागांच्या करांची वसुली वाढवा, अशा सुचना आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी वसूली विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या. कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याने नागरिकांनीही आपली जबाबदारी समजून देय असणारी देयके तात्काळ भरावीत, असे आवाहन आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
डॉ. बलकवडे म्हणाल्या की, कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याने सर्व विभाग प्रमुखांनी मागणी व थकबाकी वसुलीची प्रभावी अंमलबजावणी करणेची कार्यवाही सुरु करावी. मार्च २०२१ अखेर वसुलीचे नियोजन करावे. पाणी पुरवठा विभागाने वसूलीच्या नोटीशीची मुदत संपलेल्या ग्राहकांकडून थकबाकी वसुलीसाठी विलंब न करता वसूल करावे.
सहा. आयुक्त विनायक औंधकर म्हणाले, घरफाळा विभागाचा दर आठवडयास प्रत्येक विभागीय कार्यालयानुसार आढावा बैठक घेत आहे. थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा केला जात आहे. कर निर्धारक संजय भोसले म्हणाले, घरफाळा विभागाने आज अखेर रक्कम रुपये २९.७३ कोटी वसूली केली आहे. आज अखेर २६ हजार मिळकतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त निखील मोरे, सहा.आयुक्त विनायक औंधकर, सहा.संचालक रामचंद्र महाजन, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, जल अभियंता भास्कर कुंभार, कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, इस्टेट सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, अग्निशमन अधिकारी रणजीत चिले आदी उपस्थित होते.