कळे (प्रतिनिधी) : कळे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावामधील कोरोना रुग्ण संख्या सध्या १९१ झाली आहे. त्यापैकी २० जण सध्या पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील लोक तिथे जाण्यास घाबरत असल्याने स्वॅब देऊन तेथे जाण्यापेक्षा H R C T चाचणीच्या माध्यमातून घरीच स्थानिक डॉक्टरकडून अनेकजण उपचार घेत आहेत. तर कोणतीही टेस्ट न करता आकस्मित निधन झालेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
त्यामुळे स्थानिक पातळीवर उपचार झाल्यास रुग्णांना मानसिक आधार मिळेल. लवकर उपचार होतील याकरिता ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सहित कळे येथे कोविड सेंटर उपलब्ध व्हावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार शेडगे आणि नायब तहसीलदार कौलवकर यांना भाजपा युवा मोर्चा पन्हाळा तालुक्याच्यावतीने देण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष दिग्विजय पाटील ,तालुका सरचिटणीस मंदार परितकर, उपाध्यक्ष आदेश भोगावकर, प्रकाश पाटील, कुंदन पाटील आदी उपस्थित होते.