कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील हृदया कॅन्सर सेंटरमध्ये कोव्हिड रूग्णालय सुरू करण्यात आले. त्यांचे उदघाटन शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते फित कापून झाले.
रूग्णालयामुळे परिसरातील कोरोना बाधित रूग्णांच्यावर उपचार करण्यासाठी सोय झाली आहे, असे सांगून उपस्थित डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. सुरेखा चौगुले यांनी रूग्णालयाची माहिती दिली.
त्या म्हणाल्या, ‘रूग्णालयामध्ये एकूण ४० खाटांची सोय आहे. यापैकी २० ऑक्सिजनेटेड खाटा आहेत. सात आयसीयू खाटांची सोय आहे. दोन व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध असून नजिकच्या काळात आणखी १० खाटांची सुविधा करण्यात येईल.‘
यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार प्रदिप उबाळे, महिला व बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच राहूल शेटे, डॉ. स्वप्निल कणिरे, डॉ. दयानिधी जयस्वारा, डॉ. सुनील पाटील, डॉ. श्रीनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते.