कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हापरिषदेच्या दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या वस्तूंची जिल्हापरिषदेच्या आवारात आज (सोमवार) पासून ३ दिवस प्रदर्शन आणि विक्री चालू केली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्या हस्ते आज करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी पणत्या, मेणपणत्या, आकाश कंदील, भेटवस्तू तयार केल्या आहेत. या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री आजपासून तीन दिवस करण्यात येणार आहे. आज उद्घाटनाच्या वेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सदानंद बगाडे, सुहास कुरूकले, मुख्याध्यापक कृष्णात चौगुले, उज्वला खेबुडकर, स्मिता रणदिवे, चंद्रकांत शेटे, प्रमोद भिसे, तृप्ती गायकवाड, ईश्वरी शेडबाळे आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनात स्वयम उद्योग केंद्र, सन्मती मतिमंद विकास केंद्र व व्यवसाय प्रशिक्षण व उत्पादन केंद्र, चेतना व्यवसाय प्रशिक्षण व उत्पादन केंद्र, बौध्दिक अक्षम मुलांचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, कागल, बौध्दिक अक्षम मुलांची शाळा व कार्यशाळा जिज्ञासा राही, कर्णबधिर विद्यालय पेठवडगाव, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेफ स्कूल तिळवणी यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.

आकर्षक आकाश कंदील, पारंपरिक आकाश कंदील, लाईट माळ, दरवाजाचे तोरण, उटणे, रांगोळी, कापडी फुले, चित्रे, रंगीबेरंगी मातीच्या पणत्या आदी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.