कोलकाता (वृत्तसंस्था) : बंगालने परिवर्तनासाठीच ममता दीदींवर विश्वास ठेवला. पण, दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्वासघात केला. या लोकांनी बंगालचा विश्वास तोडला. या लोकांनी बंगालला अपमानित केलं. मुलींवर अत्याचार केले, अशी तोफ पंतप्रधान मोदी यांनी डागली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांची कोलकातातील ब्रिगेड मैदानावर आज (रविवार) सभा झाली. यावेळी मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर हल्ला चढवला.

मोदी म्हणाले की, बंगालमध्ये जन्म घेतलेल्या महान व्यक्तींनी एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना बळकट केली. बंगालच्या याच भूमीने एक संविधान, एक निशान, एक पंतप्रधान यासाठी बलिदान देणारा पूत्र दिला. या भूमीने संस्काराची ऊर्जा दिली. या भूमीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राण फुंकले. बंगालच्या या भूमीने ज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात भारताची मान उंचावली. त्याच बंगालला ममता बॅनर्जी यांनी धोका दिला. इथल्या बहिणी आणि मुलींवर अत्याचार केले. मी तुम्हाला विश्वास देण्यासाठी येथे आलो आहे. बंगालमधील परिस्थिती, गुंतवणूक, बंगालचे पुनर्निर्माण करण्याचा, विश्वास बंगालच्या संस्कृती रक्षणाची मी ग्वाही देतो. इथल्या तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी, इथल्या भगिनी आणि मुलींच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र काम करू. तुमची सेवा करण्यात कोणतीही कुचराई करणार नाही, असा विश्वास मोदी यांनी यावेळी दिला.