इचलकरंजी (प्रतिनिधी) : सातबारावरील  बँकेच्या कर्जाचा बोजा कमी करून नवीन सातबारा करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या आलास व बुबनाळ (ता.शिरोळ) येथील तलाठीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली.

गजानन आप्पासो माळी (वय ४६, सज्जा- आलास व बुबनाळ रा. १३/ ३५३, शिवाजीनगर, इचलकरंजी ता. हातकणंगले,) असे लाचेची मागणी करणाऱ्या  संशयित आरोपीचे नांव आहे.

मिळालेली माहिती अशी की, शिरोळ तालुक्यातील आलास व बुबनाळ येथील तक्रारदार यांच्या शेती गट क्रमांक १५६ मधील ५ एकर साताबाऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करून नवीन साताबारा करून देण्यासाठी तलाठी माळी यांनी तक्रारदार यांच्याकडे ७ हजार लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने इचलकरंजी येथील काँग्रेस भवन येथून तलाठी माळी याला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक सतिश मोरे, सहायक फौजदार संजीव बंबरगेकर, पोलीस नाईक नवनाथ कदम, सुनिल घोसाळकर, कृष्णात पाटील यांनी केली.