कोल्‍हापूर  (प्रतिनिधी) :  गोकुळ ने नजीकच्या काळात वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी नियोजन केले आहे. सध्या गोकुळचे दूध संकलन सतरा लाख लिटरपर्यंत पोहोचले आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत दूध संकलनात प्रतिदिन सरासरी तीन लाख लिटर दुधाची भर पडली आहे. या दुधामध्ये म्हैस दुधातील वाढ  दिलासादायक आहे. याचे सर्व श्रेय संघाचे दूध उत्पादक व गोकुळ संबधित सर्व घटकांना जाते, असे प्रतिपादन संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले.

पाटील यांनी संघाचे दूध उत्‍पादक,  प्राथमिक दूध संस्था,  अधिकारी, कर्मचारी, वितरक व ग्राहक तसेच दूध वाहतूक ठेकेदार यांना नवीन वर्षाच्या गोकुळ परिवारातर्फे शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी ते बोलत होते.

विश्वास पाटील पुढे म्हणाले की, उत्तम प्रतीचे दूध, गुणवत्तापूर्ण उत्पादने यामुळे बाजारपेठेत ‘गोकुळ ब्रँड’निर्माण झाला आहे. याचे सर्व श्रेय दूध उत्पादक शेतकऱ्यांचे, ग्राहकाचे व्यवस्थापन वर्गाचे आणि सभासदाभिमुख कामकाज करणाऱ्या संचालक मंडळाचे आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे. भविष्‍यात गोकुळची चीज, आईसक्रिम, टेट्रापॅक मधील सुगंधी दूध व ताक ही नवीन उत्पादने ग्राहकांच्या सेवेत लवकरच उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहेत. तसेच राज्‍यातील महत्‍वाच्‍या पर्यटनस्‍थळी गोकुळचे दूध व दुग्‍धजन्‍य पदार्थ सहज उपलब्‍ध होण्‍याकरिता नवीन आकर्षक अशा गोकुळ शॉपी उभारण्‍यात येणार असल्‍याचे त्यांनी सांगितले.

नवीन वर्षात  वांझ जनावरे गाभण राहण्‍याकरिता फर्टीमिन फिडची उत्‍पादन व चाचणी करण्‍याचा तसेच जनावराच्‍या शरिरातील ऊर्जा व दूधवाढीसाठी अर्ली टीएमआर पशुखाद्याची निर्मिती करण्याचा मानस असल्याचाही त्यांनी सांगितले.