पुणे ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान भारत निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांचे विभागस्तरीय प्रशिक्षण सुरु केले आहे. यामध्ये सध्या पुणे विभागातील सर्व लोकसभा मतदार संघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे विभागस्तरीय प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. याचे उद्घाटन भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ प्रधान सचिव एन.एन. बुटोलिया यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री. बुटोलिया म्हणाले, निवडणूक प्रक्रिया हे सांघिक काम आहे. निवडणूक कामात समन्वय महत्त्वाचा असून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांपासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी निवडणूक पूर्वतयारीचे योग्य नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण सर्वांसाठी एक संधी असून सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येक शंकेचे निरसन या प्रशिक्षणाच्या माध्यमातून करुन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रशिक्षणामध्ये सय्यद नासिर जमील (झारखंड), रियाज बट्ट (जम्मू-कश्मिर), अपर जिल्हाधिकारी मृणालिनी सावंत, उपविभागीय अधिकारी स्नेहा देवकाते, देबी प्रसाद मोहंती (ओडिसा), आर.सी.दास (आसाम) आदी मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणाला विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व पुणे मतदार संघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.