कुरुंदवाड प्रतिनिधी ( कुलदीप कुंभार ) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील हंगामातील शेतकरी संघटनेच्या चारशे रुपयाच्या मागणीबाबत शेतकरी संघटनांचे सहा प्रतिनिधी कारखान्याचे सहा प्रतिनिधी, प्रादेशिक साखर संचालक, लेखापरीक्षक (साखर) व इतर अधिकारी यांच्या समितीची संयुक्त बैठक घ्यावी असे निर्देश दिले होते, याचाच भाग म्हणून आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.

संचालकांनी दिलेल्या नमुन्यामध्ये सर्व साखर कारखान्यांनी आपला हिशोब व ताळेबंद समितीकडे सादर केला होता, त्याचबरोबर शेतकरी संघटनेला अपेक्षित असलेल्या सर्व माहितीसह बैठकीत आपापल्या कारखान्याचे हिशोब व ताळेबंद सादर केले होते.

या कारखान्यांचे हिशोब व ताळेबंद पाहता मागील हंगामातील गाळप झालेल्या उसापोटी सध्य परिस्थितीत कारखान्यांनाकडे रक्कम देण्यासाठी कोणतीही शिल्लक नाही, व अतिरिक्त रक्कम देखील नाही असा निष्कर्ष गठित केलेल्या समितीने काढला व ही वस्तुस्थिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार व समितीच्यावतीने शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली आहे.

यानंतर उपस्थित शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना समितीच्यावतीने वस्तूस्थिती बद्दल सविस्तर माहिती देताना गत हंगामातील आपली मागणी अव्यवहार्य आहे असेही सांगितले आहे. त्यामुळे कारखाने सुरू करणे आता गरजेचे असलेने या वर्षीचा हंगाम सुरू करु द्या असे आवाहन जवाहर, दत्त, पंचगंगा, शरद व गुरुदत्त या कारखान्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हाधिकारी व शेतकरी संघटनांकडे केली आहे.